Subscribe Us

Breaking

Thursday, August 13, 2026

📖 पुस्तक समीक्षा : At Your Best - Carey Nieuwhof यांचं वेळ, ऊर्जा आणि प्राधान्यक्रमांना योग्य दिशा देणारं जीवनदर्शन..


वेळेच्या काट्यावर धावणाऱ्या माणसाने क्षणभर थांबून स्वतःला विचारावं...

आजच्या वेगवान जगात माणूस सतत धावत आहे. सकाळ उगवण्यापूर्वीच दिवसाची धावपळ सुरू होते आणि रात्र संपता-संपता आपण थकून विचारतो, “आज दिवसभर एवढं काम करूनही मनाला समाधान का मिळालं नाही?”


आपल्याकडे प्रत्येकाच्या वाट्याला दिवसाचे समान 24 तास येतात; पण त्या 24 तासांचा उपयोग प्रत्येकजण सारखा करत नाही. काही जण वेळेच्या अभावाची तक्रार करत आयुष्य जगतात, तर काही जण उपलब्ध वेळ, ऊर्जा आणि लक्ष यांचा सुयोग्य वापर करून आपल्या आयुष्याला दिशा देतात.


म्हणून खरा प्रश्न “माझ्याकडे वेळ किती आहे?” हा नाही; तर “माझ्याकडील वेळ, ऊर्जा आणि लक्ष मी कुठे खर्च करतो?” हा आहे.


याच अत्यंत मूलभूत आणि आत्मपरीक्षणाला भाग पाडणाऱ्या प्रश्ना भोवती Carey Nieuwhof यांचं At Your Best: How to Get Time, Energy, and Priorities Working in Your Favor हे पुस्तक उभं आहे.


हे पुस्तक केवळ Time Management शिकवत नाही, तर ते आपल्याला Life Management शिकवतं. ते घड्याळाकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याकडे पाहायला शिकवतं. अधिक काम करण्यापेक्षा योग्य काम करण्याची शहाणपणाची दिशा देतं.


📚 पुस्तकात काय आहे?


At Your Best चा केंद्रबिंदू अगदी साधा आहे, पण त्याची परिणामकारकता विलक्षण आहे:

आपला सर्वोत्तम वेळ, सर्वोत्तम ऊर्जा आणि सर्वोच्च प्राधान्यक्रम यांची सांगड घालता आली, तर आपल्या जीवनाची गुणवत्ता आणि परिणामकारकता दोन्ही बदलू शकतात.

आपण दिवसभर व्यस्त असतो; पण व्यस्त असणं म्हणजे प्रभावी असणं नव्हे.

फोन, सोशल मीडिया, ई-मेल्स, सततचे मेसेजेस, मीटिंग्स, अनावश्यक कामं, इतरांच्या अपेक्षा आणि तातडीच्या वाटणाऱ्या गोष्टी यांच्यामध्ये आपला दिवस कधी निघून जातो, हेच कळत नाही.

दिवस संपतो, थकवा उरतो; पण महत्त्वाचं काय साध्य केलं? या प्रश्नाचं उत्तर मात्र अनेकदा सापडत नाही.

लेखक याच ठिकाणी एक महत्त्वाचा फरक स्पष्ट करतात..

Busy असणं आणि Productive असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत...व्यस्त माणूस अनेक गोष्टी करू शकतो; पण प्रभावी माणूस महत्त्वाच्या गोष्टी योग्य वेळी करतो.


⏳ वेळ व्यवस्थापनापेक्षा ऊर्जा व्यवस्थापन अधिक महत्त्वाचं..


या पुस्तकातील सर्वाधिक विचारप्रवर्तक संकल्पनांपैकी एक म्हणजे Energy Management.

दिवसभर आपली ऊर्जा समान नसते. काही वेळ आपण तल्लख, सर्जनशील, उत्साही आणि एकाग्र असतो; तर काही वेळ मानसिक आणि शारीरिक थकवा आपल्यावर हावी झालेला असतो.

म्हणून महत्त्वाचं काम “वेळ मिळेल तेव्हा” करण्याऐवजी,

“मी माझ्या सर्वोत्तम क्षमतेत कधी असतो?”


हा प्रश्न विचारणं अधिक महत्त्वाचं आहे.


आपली सर्वोत्तम ऊर्जा ज्या वेळेत उपलब्ध असते, तो वेळ जर किरकोळ कामांमध्ये, निरर्थक चर्चांमध्ये किंवा डिजिटल विचलनांमध्ये खर्च झाला, तर दिवसातील सर्वात मौल्यवान संसाधन आपण नकळत गमावतो.

यातून एक अत्यंत सुंदर जीवनसूत्र समोर येतं, " वेळ ही घड्याळाची संपत्ती आहे; पण ऊर्जा ही आपल्या कार्यक्षमतेची संपत्ती आहे." 


🎯 प्राधान्यक्रम म्हणजे सगळं करणं नव्हे..


आजच्या जगाने आपल्याला एक विचित्र शिकवण दिली आहे: जास्त काम करा, जास्त मिळवा, प्रत्येक संधी पकडा आणि कोणालाही ‘नाही’ म्हणू नका...पण जीवनाची खरी शहाणपणाची दिशा याच्या अगदी उलट असू शकते.

प्रत्येक संधी स्वीकारणं म्हणजे प्रगती नाही...प्रत्येक विनंती मान्य करणं म्हणजे चांगुलपणा नाही...प्रत्येक काम स्वतःच्या खांद्यावर घेणं म्हणजे कार्यक्षमतेची खूण नाही.

काही गोष्टींना “नाही” म्हणावं लागतं, कारण आपल्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींना “हो” म्हणण्यासाठी आपल्याकडे वेळ आणि ऊर्जा राखून ठेवावी लागते.

‘No’ म्हणण्याची क्षमता म्हणजे नात्यांची उपेक्षा नव्हे, तर ती स्वतःच्या प्राधान्यांशी असलेली प्रामाणिकता आहे.


🔥 सतत जळत राहणं म्हणजे प्रकाश देणं नव्हे..


आजच्या कार्य संस्कृतीसमोरचं एक मोठं आव्हान म्हणजे Burnout.

सतत काम, सतत स्पर्धा, सतत उपलब्ध राहण्याची अपेक्षा आणि सतत काहीतरी सिद्ध करण्याची धडपड यामुळे माणूस स्वतःच्या मनाचा, शरीराचा आणि नात्यांचा थकवा ओळखायलाच विसरतो.

At Your Best आपल्याला वेगळा मार्ग दाखवतं.

आयुष्य ही शंभर मीटरची शर्यत नाही, तर ती दीर्घ पल्ल्याची वाटचाल आहे..म्हणून स्वतःला इतकं झोकून देऊ नका की उद्याच्या प्रवासासाठी आजच तुमच्यात ऊर्जा उरणार नाही.

खरी उत्पादकता म्हणजे स्वतःला संपवून काम करणं नव्हे; तर दीर्घकाळ प्रभावी, अर्थपूर्ण आणि संतुलितपणे काम करण्याची क्षमता टिकवणं.


🌱 हे पुस्तक का वाचावं..?


हे पुस्तक वाचण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते आपल्याला वेळेची किंमत सांगत नाही,तर ते आपल्या जीवनाच्या दिशेची किंमत समजावून देतं.

हे पुस्तक वाचताना एक प्रश्न वारंवार आपल्या मनात उभा राहतो, “मी आयुष्य जगतोय की फक्त आयुष्याची कामं पूर्ण करतोय?”


हे पुस्तक आपल्याला शिकवतं की,


- प्रत्येक व्यस्त दिवस अर्थपूर्ण असेलच असं नाही.

- प्रत्येक तातडीची गोष्ट महत्त्वाची असेलच असं नाही.

- प्रत्येक संधी स्वीकारणं आवश्यक नसतं.

- प्रत्येकाला खूश ठेवणं शक्यही नाही आणि आवश्यकही नाही.

- सर्वोत्तम ऊर्जा सर्वोत्तम कामासाठी राखून ठेवावी लागते.

- विश्रांती ही आळशीपणाची खूण नसून दीर्घकालीन कार्यक्षमतेचा भाग आहे.

- आपल्या जीवनाची दिशा आपण ठरवली नाही, तर परिस्थिती आणि इतर लोक ती ठरवतील.


म्हणून हे पुस्तक वेळ वाचवण्यासाठी नव्हे, तर वेळेला अर्थ देण्यासाठी वाचावं.


👥 कोणी वाचावं?


हे पुस्तक केवळ Corporate जगातील लोकांसाठी नाही. उलट, जबाबदाऱ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते उपयुक्त आहे.,,विशेषतः... विद्यार्थ्यांनी..अभ्यास, मोबाईल, मनोरंजन आणि भविष्यातील ध्येय यांच्यात प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी.


शिक्षकांनी आणि शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींनी आपली सर्वोत्तम मानसिक ऊर्जा विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक कार्याच्या गुणवत्तेसाठी वापरण्यासाठी...


पालकांनी मुलांना केवळ वेळ देण्याऐवजी गुणवत्तापूर्ण वेळ देण्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी.

उद्योजक आणि व्यावसायिकांनी अनेक कामांमध्ये अडकून न पडता परिणामकारक कामांना प्राधान्य देण्यासाठी.


 लेखक, सर्जक आणि विचारवंतांनी सर्जनशीलतेसाठी आवश्यक असलेली शांतता, एकाग्रता आणि मानसिक ऊर्जा जपण्यासाठी.

सतत धावणाऱ्या प्रत्येक माणसाने एकदा थांबून स्वतःला विचारण्यासाठी की, “मी नेमकं कुठे आणि कशासाठी धावत आहे?”


💎 पुस्तकातून मिळणारी जीवनमूल्ये..


या पुस्तकाचं महत्त्व केवळ Productivity Tips मध्ये नाही. त्यातून काही मूलभूत जीवनमूल्ये समोर येतात..


1. आत्मभान : आपली क्षमता, मर्यादा, ऊर्जा आणि जीवनातील खऱ्या प्राथमिकता ओळखण्याचं भान.

2. शिस्त : वेळ आणि ऊर्जा यांना स्वैरपणे खर्च न करता त्यांचा जाणीवपूर्वक वापर करण्याची शिस्त.

3. प्राधान्यक्रम : सगळं करण्याऐवजी सर्वात महत्त्वाचं काय आहे, हे ओळखण्याची विवेकबुद्धी.

4. संयम : तात्काळ परिणामांच्या मागे न धावता दीर्घकालीन यशासाठी सातत्य राखण्याची वृत्ती.

5. नकार देण्याचं धैर्य : प्रत्येक गोष्टीला होकार देण्याऐवजी आपल्या ध्येयाशी विसंगत गोष्टींना स्पष्टपणे ‘नाही’ म्हणण्याचं सामर्थ्य.

6. संतुलन : काम, कुटुंब, आरोग्य, नाती, विश्रांती आणि स्वतःचा विकास यांच्यात समतोल राखण्याची जाणीव.

7. एकाग्रता : विखुरलेल्या लक्षाला एका महत्त्वपूर्ण दिशेने केंद्रित करण्याची क्षमता.

8. सातत्य : क्षणिक उत्साहापेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या कार्यक्षमतेवर विश्वास.

9. आत्मसंरक्षण : आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा जपणं ही स्वार्थी वृत्ती नसून दीर्घकालीन जबाबदारी आहे, ही जाणीव.

10. अर्थपूर्ण जीवन : फक्त अधिक मिळवण्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण जगण्याची प्रेरणा.


🌿 या पुस्तकाचा वैचारिक गाभा..✍️


या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश मला असा वाटतो, “तुमच्याकडे वेळ कमी आहे असं नाही; कदाचित तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं लक्ष योग्य ठिकाणी वापरलं जात नाही.”

आपण आयुष्यात किती कामं केली, किती पैसा मिळवला, किती लोकांना भेटलो किंवा किती व्यस्त राहिलो यापेक्षा एक प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे:

आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ आपण कोणत्या गोष्टींसाठी खर्च केली?

कारण शेवटी आयुष्याची श्रीमंती ही आपल्या दिनदर्शिकेतील भरलेल्या चौकटींमध्ये नसते; ती आपण जपलेल्या नात्यांमध्ये, पूर्ण केलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये, साध्य केलेल्या ध्येयांमध्ये आणि आपल्या अस्तित्वाला मिळालेल्या अर्थामध्ये असते.


📖 पुस्तक आपल्याला काय शिकवतं..?


At Your Best आपल्याला अधिक वेगाने धावायला सांगत नाही...ते म्हणतं,


थांबा...

स्वतःकडे पाहा...

आपली दिशा तपासा...

आपली ऊर्जा ओळखा...

आपली प्राधान्यं ठरवा...

आणि मग योग्य दिशेने जाणीवपूर्वक चला...


कारण वेगाला दिशा नसेल, तर तो केवळ धावपळ ठरतो...दिशा असेल तरच वेगाला अर्थ प्राप्त होतो.

आयुष्याच्या शेवटी आपल्याला कदाचित ही खंत राहणार नाही की आपण प्रत्येक ई-मेलला उत्तर दिलं नाही, प्रत्येक मीटिंगला उपस्थित राहिलो नाही किंवा प्रत्येक काम पूर्ण केलं नाही...


पण कदाचित एक प्रश्न मात्र मनाला छळत राहील, “ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या होत्या, त्यांना मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ दिला का?”


म्हणून At Your Best हे केवळ Productivity Book नाही...ते स्वतःच्या आयुष्याचा प्राधान्यक्रम पुन्हा एकदा तपासून पाहण्याचं निमंत्रण आहे...


ते सांगतं..

वेळ ही संपत्ती आहे,

ऊर्जा ही शक्ती आहे,

लक्ष ही दिशा आहे,

आणि प्राधान्यक्रम हे आयुष्याचं कंपास आहे...


ही चारही साधनं योग्य दिशेने वापरली, तर आयुष्य केवळ व्यस्त राहत नाही; ते अर्थपूर्ण बनतं.

आणि म्हणूनच... “सतत व्यस्त राहण्यापेक्षा, योग्य वेळी योग्य गोष्टींसाठी आपल्या सर्वोत्तम रूपात उपस्थित राहणं अधिक महत्त्वाचं आहे.”


हीच At Your Best ची खरी शिकवण आणि या पुस्तकाची सर्वात मोठी जीवनदृष्टी आहे..


⭐ माझं मूल्यांकन : 4.5/5 


एक पुस्तक जे वेळ व्यवस्थापनापासून जीवन व्यवस्थापनाकडे, धावपळीपासून दिशेकडे, आणि व्यस्ततेपासून अर्थपूर्णतेकडे घेऊन जातं.


🎓 हें पुस्तक खरेदी करण्यासाठी ऑनलाईन लिंक :


https://amzn.in/d/0e9KWwp9


-पुस्तक समीक्षक.. ✍️

 एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..

#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख 

The Spirit of Zindagi Foundation 

🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

No comments:

Post a Comment