पुस्तक समीक्षा :
The Purpose of Life : Find Your Path to Oneness
“माणूस आयुष्यभर जगण्यासाठी साधने गोळा करत राहतो; पण त्या धावपळीत आपण नेमके कशासाठी जगतो आहोत, हा प्रश्नच अनेकदा मागे पडतो. जीवनाचे खरे वैभव किती मिळवले यात नसून, आपण स्वतःला किती ओळखले, किती समृद्ध झालो आणि आपल्या अस्तित्वाला किती अर्थ दिला..यात दडलेले असते.”
हरित रत्न यांचे The Purpose of Life : Find Your Path to Oneness हे पुस्तक केवळ ‘आयुष्य कसे जगावे?’ याचे तयार उत्तर देणारे पुस्तक नाही; उलट ‘मी कोण आहे?’, ‘माझ्या जगण्याचा उद्देश काय?’, ‘खरा आनंद कुठे आहे?’, ‘नाती, आसक्ती, बदल, नियती आणि चेतना यांच्याकडे आपण कसे पाहावे?’ अशा मूलभूत प्रश्नांकडे वाचकाला अंतर्मुख करणारे वैचारिक दालन आहे.
आज माणसाकडे जगण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक साधने आहेत; पण जगण्यामागचा अर्थ शोधण्याची अस्वस्थताही तितकीच वाढली आहे. हातात स्मार्टफोन आहे, जगाशी क्षणात संवाद आहे, माहितीचा महासागर आहे; तरीही मनाच्या किनाऱ्यावर एकटेपणा, अस्वस्थता, तुलना, अपेक्षा आणि अपूर्णतेच्या लाटा आदळत आहेत. अशा काळात हे पुस्तक बाहेरच्या कोलाहलातून वाचकाला अलगद स्वतःच्या अंतरंगाकडे घेऊन जाते.
आपल्या समाजाने यशाच्या काही ठरावीक व्याख्या तयार केल्या आहेत...चांगली पदवी, मोठी नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, मालमत्ता आणि सामाजिक मान्यता... या गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी त्या म्हणजे संपूर्ण जीवन नव्हे, हा विचार पुस्तकाच्या चिंतनातून प्रकर्षाने पुढे येतो.
कारण माणूस जग जिंकू शकतो; पण स्वतःशीच हरलेला असेल तर त्या विजयाला अर्थ किती..?
याच ठिकाणी The Purpose of Life वाचकाला थांबवते आणि स्वतःशी संवाद साधण्यास भाग पाडते. बाहेरच्या जगातील यशाच्या पायऱ्या चढताना आपल्या आतल्या माणसाला आपण कुठे विसरलो नाही ना, याचा शोध घेण्यास प्रवृत्त करते.
पुस्तकाचा मध्यवर्ती धागा म्हणजे ‘Oneness’ म्हणजे एकात्मता.. स्वतःला जगापासून वेगळे समजण्याऐवजी जीवन, निसर्ग, माणसे आणि व्यापक विश्वाशी असलेले आपले परस्परसंबंध समजून घेण्याचा हा दृष्टिकोन आहे. व्यक्तिगत विकासाला केवळ ‘मी’च्या चौकटीत बंदिस्त न करता तो व्यापक अस्तित्वाशी जोडण्याचा लेखकाचा प्रयत्न विचारप्रवर्तक ठरतो.
या पुस्तकातील विशेष विचारांपैकी एक म्हणजे आसक्ती आणि अनासक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन.
अनासक्ती म्हणजे नाती सोडून देणे, जबाबदाऱ्यांपासून पळणे किंवा जगापासून दूर जाणे असा सरधोपट अर्थ लेखक मांडत नाही. उलट, माणसांशी जोडा, प्रेम करा, प्रयत्न करा; मात्र प्रत्येक कृतीच्या परिणामाला स्वतःच्या आनंदाची बेडी बनवू नका, अशी भूमिका पुस्तकातून पुढे येते.
हा विचार आजच्या तरुण पिढीसाठी विशेष महत्त्वाचा वाटतो.
कारण आपण अनेकदा आपल्या आनंदाची चावी दुसऱ्यांच्या हातात देतो..लोकांनी कौतुक केले तर आनंदी, टीका केली तर दुःखी; यश आले तर स्वतःला श्रेष्ठ समजायचे आणि अपयश आले तर स्वतःच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करायचे.
पुस्तक अप्रत्यक्षपणे सांगते.. " प्रयत्न तुमचे असू द्या; पण परिणामाला तुमच्या आत्ममूल्याचा न्यायाधीश बनवू नका."
या पुस्तकाची एक जमेची बाजू म्हणजे त्याची प्रश्नोत्तरात्मक रचना. तत्त्वज्ञान अनेकदा क्लिष्ट भाषेमुळे सामान्य वाचकापासून दूर जाते.लेखक हरित रत्न मात्र इतिहास, पौराणिक कथा, लोकप्रिय संस्कृती आणि विविध जीवनानुभवांच्या संदर्भांतून अनेक तात्त्विक संकल्पना तुलनेने सहजपणे मांडतात.
म्हणून हे पुस्तक केवळ ‘वाचून संपवण्याचे’ नाही; तर काही पानांनंतर थांबून स्वतःशी चर्चा करण्याचे आहे.
कदाचित प्रत्येक उत्तर वाचकाला पटेलच असे नाही आणि ते आवश्यकही नाही. चांगल्या वैचारिक पुस्तकाचे सामर्थ्य प्रत्येक प्रश्नाचे अंतिम उत्तर देण्यात नसते; तर आपल्या मनात नवे प्रश्न जन्माला घालण्यात असते.
हीच या पुस्तकाची खरी बौद्धिक ताकद म्हणता येईल,मित्रांनो..
आजची पिढी प्रचंड स्पर्धेच्या वावटळीत उभी आहे. करिअर, पैसा, सोशल मीडिया, प्रसिद्धी, तुलना आणि ‘इतरांपेक्षा पुढे जाण्याची’ अदृश्य शर्यत माणसाला सतत धावत ठेवते.
पण प्रत्येक धावण्यापूर्वी एक प्रश्न विचारायला हवा..
“मी कुठे पोहोचण्यासाठी धावत आहे?”
कारण चुकीच्या दिशेने वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेने शांतपणे चालणे अधिक अर्थपूर्ण असते.
जीवनाचा उद्देश प्रत्येकासाठी एकाच साच्यातला असू शकत नाही. कोणासाठी ज्ञान, कोणासाठी समाजसेवा, कोणासाठी कला, संशोधन, कुटुंब, मानवता किंवा स्वतःचा अंतर्मुख शोध..उद्देश वेगवेगळा असू शकतो. महत्त्वाचे एवढेच की, " आपले जीवन गर्दीने ठरवलेल्या दिशेने वाहत जाण्याऐवजी विवेकाने निवडलेल्या दिशेने प्रवाहित झाले पाहिजे."
या पुस्तकाकडे केवळ प्रेरणादायी साहित्य म्हणून न पाहता चिकित्सक दृष्टीनेही पाहणे आवश्यक आहे. पुस्तकातील अनेक मांडण्या अध्यात्मिक आणि तात्त्विक स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक संकल्पना वैज्ञानिक किंवा वस्तुनिष्ठ निष्कर्ष म्हणून स्वीकारण्याऐवजी चिंतनासाठी मांडलेला दृष्टिकोन म्हणून वाचणे अधिक योग्य ठरेल.
‘Oneness’, नियती, चेतना किंवा विश्वाशी एकात्मता यांसारख्या संकल्पनांशी प्रत्येक वाचक तितकाच सहमत होईल असे नाही. विवेकवादी वाचकाने पुस्तकातील विचारांना प्रश्न विचारावेत, स्वतःच्या अनुभवाशी आणि तर्काशी तपासून पाहावे आणि जे जीवन समृद्ध करणारे वाटेल ते स्वीकारावे.
कारण वाचनाचा खरा उद्देश लेखकाच्या प्रत्येक विचाराला शरण जाणे नसून, स्वतःच्या विचारांना अधिक प्रगल्भ करणे हा आहे.
जीवनाला वर्षे नव्हे, अर्थ द्या...मित्रांनो..!
The Purpose of Life शेवटी आपल्याला एका अत्यंत साध्या पण खोल सत्यासमोर उभे करते, " आपण जन्माला आलो म्हणून जगायचे की जगण्याला काही अर्थ निर्माण करायचा, हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा असतो."
आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू यांच्यामधील केवळ कालावधी नाही. त्या दोन टोकांमध्ये आपण किती प्रेम निर्माण केले, किती ज्ञान मिळवले, किती प्रश्न विचारले, किती माणसे जोडली, किती दुःख हलके केले आणि स्वतःच्या अस्तित्वाला किती अर्थ दिला हीच कदाचित जीवनाच्या सार्थकतेची खरी मोजपट्टी आहे.
पैसा जीवनाला सुविधा देऊ शकतो; पद प्रतिष्ठा देऊ शकते; ज्ञान दिशा देऊ शकते..पण जीवनाला ‘अर्थ’ मात्र स्वतःलाच निर्माण करावा लागतो.
म्हणूनच हे पुस्तक वाचताना प्रश्न केवळ“What is the purpose of life?” एवढाच राहत नाही..
तो हळूहळू अधिक व्यक्तिगत होतो,
“What is the purpose of my life?”
आणि ज्या दिवशी माणूस हा प्रश्न गर्दीला नव्हे, तर स्वतःच्या विवेकाला विचारायला सुरुवात करतो, त्या दिवसापासून कदाचित त्याचे केवळ अस्तित्व संपून अर्थपूर्ण जगणे सुरू होते...!
-पुस्तक समीक्षक.. 
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
#ThePurposeOfLife #FindYourPathToOneness #HaritRatna #BookReview #BookRecommendation #MustRead #BookLovers #ReadersCommunity #ReadingMotivation #PurposeOfLife #MeaningOfLife #LifePurpose #Oneness #SelfDiscovery #SelfAwareness #InnerJourney #KnowYourself #ConsciousLiving #MindfulLiving #PersonalGrowth #PositiveThinking #LifePhilosophy #PhilosophyOfLife #Wisdom #SpiritualGrowth #IntellectualGrowth #CriticalThinking #RationalThinking #ThinkDifferent #QuestionEverything #ReadThinkGrow #BooksThatMakeYouThink #BooksThatChangeYou #वाचनसंस्कृती #पुस्तकसमीक्षा #पुस्तकप्रेमी #वाचालतरवाचाल #जीवनाचाअर्थ #जीवनाचाउद्देश #आत्मशोध #स्वतःचाशोध #विवेकवादी #विवेकनिष्ठविचार #वैचारिकलेखन #प्रेरणादायीविचार #प्रबोधन #ज्ञान #वाचनप्रेरणा #मराठीवाचक #मराठीसाहित्य #विद्यार्थीमित्र #प्रारफीकशेख #TheSpiritOfZindagi #DrKalamFoundation #APJAbdulKalam #विद्यार्थीफाउंडेशन #Parbhani #maharashtra
No comments:
Post a Comment